अखेर ‘त्या’ शिक्षकांचे निलंबन; सीईओंची कारवाई..


दक्ष न्युज प्रतिनिधी, संतोष विधाते

दिंडोरी: तालुक्यातील दोन शिक्षकांची हाणामारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेत शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केला होता. परंतू दोन महिने उलटूनही देखील कारवाई होत नसल्याने त्या हाणामारीचा व्हिडीओ प्रसार माध्यमात प्रसारीत होवून देखील कारवाई होत नसल्याने प्रसारमाध्यमांनी यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला असता जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ दखल दोन्ही शिक्षकांचे निलंबन केले आहे.

दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 येथे केंद्रप्रमुखांनी दि. 13 मार्च 2024 रोजी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पूर्व-वैमनस्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 चे शिक्षक प्रवीण दिनकरराव देशमुख (दळवी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर येथील धनंजय विष्णू क्षत्रिय या दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केलेला असताना देखील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असतानाच अचानक दोन शिक्षकांच्या ‘त्या’ हाणामारीचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये सर्वत्र फिरत असल्याने प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले जात होते. तेव्हा आता तरी प्रशासन दखल घेईल का ? असा सवाल उपस्थित करत दैनिक देशदूतने सविस्तर वृत्त प्रसिध्द करीत सदर प्रकाराला वाचा फोडली. अखेर त्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दोन्ही शिक्षकांचे निलंबनाचे आदेश पारीत केले आहे. यामुळे नक्कीच शिक्षण विभागात प्रशासनाची दहशत निर्माण झाली असून या कारवाईने चुकीच्या गोष्टींना आळा बसणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *