घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळ हिमालयाच्या भेटीला.


दक्ष न्यूज प्रतिनिधी, भागीरथ आतकरी

इगतपुरी: तालुक्याच्या सह्याद्रीतील घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे शिवप्रेमी,दुर्गप्रेमी असलेले गिर्यारोहक आपले व्यवसाय सांभाळून नेहेमीच ऐतिहासिक,धार्मिक,सामाजिक बांधिलकी ठेऊन निसर्गातील छंद जोपासतात.हिमालयातील “पंचकैलास पर्वतांपैकी” चीनमध्ये असलेले प्रथम कैलास मानसरोवर पर्वत तसेच भारतातील उत्तराखंडमधील द्वितीय आदीकैलास पर्वत आणि हिमाचल प्रदेशात असलेले श्रीखंड कैलास,किंनौर कैलास,मणीमहेश कैलासपर्वत.या “पंच कैलास” पर्वतांवर साक्षात देवांचेदेव महादेव व त्यांच्या परिवाराचे निवासस्थान असल्याने हिंदू धर्मात “पंचकैलासचे” अतिशय महत्त्व आहे.

यापैकी हिमालयातील पर्वत रांगेत उत्तराखंड मधील पिथोरागड जिल्ह्यात व्यास व्हॅलीतील ६३१० मिटर उंच असलेले आदिकैलास पर्वत,ओम् पर्वतचे आणि हिमालयाच्या पर्वत रांगेचे दर्शन घेण्यासाठी प्रसिध्द कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीपासून दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या भारत,चीन,नेपाळच्या सरहद्दीवरील ज्योलिंगकांग भागात जाऊन आदिकैलास पर्वत तसेच हिमालयाच्या पर्वत रांगेत असलेले पार्वती मुकुट,पांडव पर्वत,पांडव किल्ला,गौरी कुंड,गणेश पर्वत,नाग पर्वत,व्यास गुफा, काली मंदिर,काला पानी,नाभी पर्वत,नैसर्गिक ओम् असलेला ओम् पर्वतचे दर्शन घेतले.प्रसिध्द कैलास मानसरोवर इतकेच महत्व आदिकैलासचे आहे.

ही यात्रा एक तिर्थयात्रा तसेच ट्रेकिंग मार्ग आहे म्हणून प्रत्येक गिर्यारोहकाचे ही यात्रा व ट्रेकिंग करण्याचे एक स्वप्न असते.व्यास व्हॅलीत हा एक अप्रतिम अध्यात्मिक प्रवास आहे.या यात्रेचा मार्ग उत्तराखंड राज्यातील काठगोदाम,नैनीताल कैचीधाम, जागेश्र्वर धाम,पिथोरागड,धारचुला येथून जातो.या प्रवासात देवभूमीहिमालयात बर्फवृष्टीने सजलेले उंच शिखरे,नयनरम्य दऱ्या,हिरवीगार वनराई आणि सरोवरांचे विस्मयकारक दृष्य नजरेत भरते.हिमालयात प्रत्येक कंकर कंकर मध्ये साक्षात भगवान शंकराचे दर्शन घडते.

गतवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आदीकैलास पर्वतचे दर्शन घेतले.त्यामुळे या तिर्थस्थळाचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी झाली आहे.इगतपुरी तालुक्यातून प्रथमच कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे,रामदास चौधरी,किसन बिन्नर,संजय शर्मा हे गिर्यारोहक हिमालयातील आदीकैलास व ओम् पर्वतच्या दर्शनाला व ट्रेकिंगला तसेच हिमालयाच्या भेटीला गेल्यामुळे या सह्याद्रीच्या मावळ्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *