२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव; लोकगीतांनी घडविले लोकसंस्कृतीचे दर्शन..


पारंपरिक लोकगीतांच्या श्रवणीय सादरीकरणानं आणली रंगत..

दक्ष न्युज, प्रतिनिधी

नाशिक: राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध राज्यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या श्रवणीय लोकगीतांनी महोत्सवात रंगत आणली. या लोकगीतांतून विविध राज्यातील लोकसंस्कृती, परंपरांचे प्रेक्षकांना दर्शन घडविले. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज रावसाहेब थोरात सभागृहात विविध राज्यातील कलाकारांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकगीत कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले.

कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि गोवा‌ राज्यातील कलाकारांनी लोकगीते सादर केली‌. प्रत्येक राज्यातील कलाकारांनी आपल्या पारंपरिक गीते, संगीत, सुरांद्वारे श्रवणीय, नादरम्य लोकगीते सादर केली‌. महादेवाच्या अलौकिक शक्तीचे महत्त्व विशद करणारे कर्नाटकचे लोकगीत, महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकगीते, झारखंडच्या दारूच्या व्यसनावर मार्मिक भाष्य करणारं, लडाखच्या कलाकारांच्या भावस्पर्शी सुरांनी गाव आणि आईच्या प्रेमाची तळमळ‌ व्यक्त करणारे, हरियाणाच्या कलाकारांनी‌ सकस अभिनयासह सादर केले. लोकगीते आणि छत्तीसगढच्या प्राचीन परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या लोकगीतांनी उपस्थितांना अवर्णनीय आनंद दिला.

स्पर्धा स्वरूपात सादर झालेल्या आजच्या सांघिक व वैयक्तिक लोकगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ. रंजना सरकार, डॉ. टी.व्ही. मणिकंदन आणि ओंकार वैरेगकर यांनी काम पाहिले. नेहरू युवा केंद्राचे पंजाब राज्याचे संचालक परमजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संचालक सूर्यकांत कुमार, धुळे जिल्हा युवा अधिकारी अविनाश आणि रेश्मा चंद्रन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन‌ केले.

“लोकगीतांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, तसा तो केवळ संगीताचा उत्सवच राहिला नाही तर भारताच्या लोकसंस्कृती, परंपरा व‌ एकात्मतेचे दर्शन घडविणारा ठरला.” अशी भावना परमजित सिंग यांनी ‌व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *