गुजरात राज्यातून येणाऱ्या मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई


दक्ष न्यूज प्रतिनिधी : सागर वाबळे

नाशिक : आगामी गणपती उत्सव, नवरात्रोत्सव व दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

याचाच भाग म्हणून शुक्रवार, दिनांक 15 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता द्वारका सर्कल येथे गोपनीय माहितीच्या अनुषंगाने गुजरात राज्यातून येणाऱ्या खाजगी बसेसची तपासणी केली असता, बलदेव ट्रॅव्हल्स व श्रीविजय ट्रॅव्हल्स या खाजगी बसमधून अहमदाबाद, गुजरात येथून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणून रॉयल एक्सप्रेस ट्रॅव्हल्स यांच्या कार्यालयाजवळ उतरवण्यात आले. गुजरात राज्यातून आणलेल्या भेसळयुक्त मिठाईचा वापर हा नाशिक शहरातील मिठाई विक्रेते हे मिठाई, मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद आदि पदार्थ तयार करण्यासाठी करतात असा संशय अन्न व औषध प्रशासनाला आल्याने व त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुधाचा समावेश नसल्याने याविरूध्द अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबवून भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे.

जप्त केलेले अन्नपदार्थ मे. अनुष्का स्वीट सप्लायर्सचे मालक रविकांत सिंग यांच्याकडून स्पेशल बर्फीची 11 बॅग्ज किंमत रुपये 41 हजार, मे. डीकलशियन स्वीटसचे मालक श्री. श्याम यांच्याकडील 3 बॅग्जची किंमत 11 हजार रूपये तर श्री. कन्हैया यांचेकडील 5 खोक्यांची किंमत 17 हजार 290 रूपये याप्रमाणे जप्त केलेल्या भेसळयुक्त मिठाईची एकूण किंमत 69 हजार 290 रूपये असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

नाशिक शहरातील द्वारकाजवळील सोनाका ॲग्रो फुडचे मालक संदेश कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठ्यातून रिच स्वीट डिलाईट along (राधे) चा 298 किलो व 250 किलोची एकूण किंमत 74 हजार 500 किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहे. त्यानंतर श्री. कल्पेश नवरतन गुप्ता, गुरुगोविंद कॉलेज जवळ, नाशिक यांचेकडून (Traditional Sweet) चे 14 पाकिटे, 148 किलो असून, 29 हजार 660 रूपये किंमतचा साठा नमुना घेवून जप्त केला आहे. श्री. लच्छाराम चौधरी यांचे मे. महालक्ष्मी स्वीट, जेल रोड यांनी मागविलेल्या कलाकंद स्वीट्सचा नमुना त्यांच्याकडून घेवून 13,920/- रुपये किंमतीचा 58 किलो जप्त करण्यात आला आहे. याप्रमाणे संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थाची एकूण किंमत 2 लाख 10 हजार 910 रूपये असल्याचे संबंधीत विभागाने कळविले आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन, उमेश सुर्यवंशी, अमित रासकर, प्रमोद पाटील तसेच सहायक आयुक्त, श्री. लोहकरे, श्री. मनिष सानप, नमुना सहायक श्री. विकास विसपुते यांनी सह आयुक्त (अन्न) श्री. सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

नागरीकांनी दुधापासुन तयार करण्यात आलेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच मिठाई खरेदी करावी. त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेल्या मिठाईची विक्री करावी तसेच त्याबाबत दुकानात स्पष्ट फलक लावण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

नागरीकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा. असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *