नाशिक

आयुष्यमान भव मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जलज शर्मा


दक्ष न्यूज प्रतिनिधी: सागर वाबळे


नाशिक : केंद्र शासनाच्या ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा नाशिक जिल्ह्यात 17 सप्टेंबर 2023 पासून शुभारंभ होत आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येक शनिवारी आयुष्यमान मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भव मोहिमेत सहभागी होवून आरोग्य विषयक सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयुष्यमान भव मोहिम संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदिप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. दिपक लोणे यांच्यासह माध्यम प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

  • आयुष्यमान भव मेळाव्यात या आजारांवर मिळणार उपचार

जिल्हा रूग्णालय नाशिक, सामान्य रूग्णालय नाशिक सह जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयांत आयुष्यमान मेळावा हा 17 सप्टेंबर 2023 पासून दर शनिवारी होणार असून या साप्ताहिक मेळाव्यात प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचा रोग, मानसिक आजार, दंत शल्यचिकित्सक, टेलीकन्लटेशन सेवा ईत्यादी तज्ञ यांच्यामार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथुन संदर्भित झालेल्या रुग्णांना विशेषज्ञांमार्फत औषधी उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. यासाठी 102 व 108 रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 17 सप्टेंबर ते 02 आक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा स्वच्छता पखवाडा’ घेण्यात येणार असून यात सर्व शासकीय रुग्णालय येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 2 आक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये आयुष्यमान सभा आयोजीत करण्यात येणार आहे. या सभेत नागरिकांना आरोग्य विषयक सर्व योजनांची माहिती, आयुष्यमान गोल्डन कार्ड व आभा कार्ड याबद्दल माहिती देण्यात येणार असून लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यात येणार आहे.

17 सप्टेंबर 2023 पासून वय वर्षे 18 व त्यावरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मोफत उपचार करण्यात येणार आहे. यासोबतच 30 वर्ष वयावरील व्यक्तींची असांसर्गीक आजारांची तपासणी, उपचार व संदर्भ सेवा प्रत्येक गावामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांचे पथका मार्फत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांचीही तपासणी, उपचार व संदर्भ सेवा RBSK पथक व समुदाय आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. ‘टी.बी.मुक्त भारत’ अंतर्गत संशयीत क्षय रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार असून उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणा-या ग्रामपंचायतींना पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी दिली.

  • आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत असे आहेत आरोग्य विषयक कार्यक्रम


11 ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीतील सेवा पंधरवाडा सुरू झाला आहे. 17 ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबीर, अवयव दानाचे आवाहन असे कार्यक्रम होणार आहेत. 17 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत वय वर्षे 18 वरील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिमचे आयोजन केले आहे. 1 ते 8 नोव्हेंबर 2023 आणि 25 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी केली जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *