धुळ्यात माजी मंत्र्यांसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; जाणून घ्या! काय आहे प्रकरण..
दक्ष न्युज, प्रतिनिधी
धुळे: याआधी अनेक मंत्र्यांचे घोटाळे आपण पहिले असतील त्यातच आता धुळ्यातून एका माजी मंत्र्यासह चार जणांचे गैरव्यवहार समोर आले आहे. धुळ्यातील माजी मंत्र्यांसह चौघांवर शेत मिळकतीबाबत गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमताने आर्थिक फायद्यासाठी खोटे कागदपत्र, दस्तावेज तयार करून शेती मिळकतीसंदर्भात गैरव्यवहार केल्याचा माजी मंत्र्यांसह चौघांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर …
सहकार विभागाचे शेखर साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४ मार्च २००३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दोंडाईचा येथील तत्कालीन अध्यक्षांनी संस्थेच्या नावावर नोंदणी दस्त केले.
याद्वारे तावखेडे प्र. बे. येथे खरेदी केलेली शेतजमीन मिळकतीची खरेदी- विक्री, तसेच कोणत्याही स्वरूपाचे हस्तांतरण दाखविताना त्यासाठीचा दस्त कायद्याने ठरवून दिलेल्या रकमेच्या स्टँप पेपरवर आणि रजिस्ट्रेशन शुल्क न भरता, त्या संदर्भात कोणतीही पूर्तता न करता परस्पर स्वतःच्या नावे खोटे दस्त करून घेत संशयितांनी संगनमताने बेकायदेशीरपणे गैरव्यवहार केला.
त्यातून मिळकत गैरमार्गाने स्वतःच्या नातेवाइकांच्या नावावर करून घेतल्याने माजी मंत्री तथा शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, तत्कालीन सहकार अधिकारी प्र. वा. तोरणे, तत्कालीन मंडळाधिकारी व शिंदखेड्याचा तलाठी आदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.