आता ‘हॉकर्स झोन’ मध्ये टपरीधारकांचाही समावेश..


शहर समितीच्या बैठकीत झाला निर्णय..

दक्ष न्यूज प्रतिनिधी

नाशिक: शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसोबतच आता सर्व मांडणीधारक व टपरी धारकांनाही राष्ट्रीय फेरीवाला धोरणात समाविष्ट केले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. अन्य फेरीवाल्यांसोबत त्यांच्याकडूनही आता दैनंदिन शुल्क वसूल केले जाणार असल्याने सुमारे दोन हजार टपरीधारकांना महापालिकेच्या संभाव्य कारवाईपासून संरक्षण मिळणार आहे. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत फेरीवाला झोन आणि फेरीवाले,मांडणीधारक, टपरीधारकांसंदर्भातील अनेक प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शहरातील बाजार पेठांच्या सुमारे दोन हजार मांडणीधारक, लहान टपरीधारक व्यवसाय करीत आहेत. परंतु शहरविकास नियंत्रण नियमावलीत मांडणीधारक, टपरीधारकांना मजुरी नसल्याने महापालिकेच्या जागेवर असलेल्या या मांडणी, टपरीधारकांना हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यास शहर फेरीवाला समिती सदस्यांनी कडाडून विरोध दर्शवल्याने या मांडणी, टपरीधारकांचा फेरीवाला धोरणात समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *