डॉ . भारती पवार यांची कोरोना काळातील कामगिरी उल्लेखनीय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक!


दक्ष न्युज प्रतिनिधी, संतोष विधाते

दिंडोरी: लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉ भारतीताई पवार आणि नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी जी यांची सभा पार पडली. भाषणात सुरूवातीला नरेंद्र मोदी यांनी जनतेची सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य असल्याचे नमूद केले. त्यासाठीच गेल्या दहा वर्षात पंतप्रधान म्हणून काम करताना जनकल्याणकारी अनेक योजना राबवता आल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाकडे देश चालवण्यासाठी लागणारी दृष्टी नाही. त्यासाठीच जनतेने गेल्या दहा वर्षात त्यांना नाकारलं आहे असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सांगितले.

देशाला आता ‘कडे और बडे फैसले’ घेणारा मजबूत प्रधानमंत्री आणि मजबूत सरकार हवा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक केवळ खासदार नाही तर पंतप्रधान निवडण्याची असल्याची आठवण त्यांनी जनतेला करून दिली. या दरम्यान, डॉ भारतीताई पवार यांच्या कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्य खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने मोठे काम केले असल्याची कामाची पावती पंतप्रधान म्हणून खुद्द मोदींनी दिली.

दिंडोरी व नाशिक मतदारसंघात 600 पेक्षा अधिक आयुषमान आरोग्य मंदिर, जनसेवा औषधालय माध्यमातून 80% स्वस्तात औषधे, 2 लाख गर्भवती महिलांना 6 लाख रुपये, 70 वर्षांवरील जेष्ठांना 5 लाखांपर्यन्त मोफत उपचार अशा कित्येक गरीब कल्याणच्या योजना सरकारने राबवल्या असल्याचे सांगत असताना सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट केले.गेल्या दहा वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीच्या आधारावर पुन्हा एकदा जनता आपल्यालाच निवडून देऊन अजून मोठं बहुमत देईल याबाबत त्यांनी खात्री व्यक्त केली. तसेच त्यांनी शेतकरी वर्गासाठी केलेल्या कामाची उजळणी केली. केंद्र सरकारने पहिल्यांदाच कांदा बफर क्षेत्र बनवलं ज्याच्या माध्यमातून 7 लाख मेट्रिक टन कांदा सरकारने शेतकर्‍यांकडून विकत घेत साठवला.

गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने कांद्याची निर्यात वाढावी यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे फळ म्हणून 35% कांदा निर्यात वाढली असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने ‘ओपेरेशन ग्रीन’ अंतर्गत निर्यातीवर सबसिडी दिली असल्याचे नमूद केले. नाशिकच्या द्राक्षे बागायतदार शेतकर्‍यांना सुद्धा त्यांनी आश्वासित केले. त्यांच्यासाठी ‘क्लस्टर डेवलपमेंट’ करत असल्याचे सांगत शेतकरी त्यातून समृद्ध होईल याबाबत खात्री व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *