आदर्श शाळेचा लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात…


दक्ष न्युज प्रतिनिधी, नागिंद मोरे

धुळे: शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी खर्चापोटी एक हजारांची लाच मागणाऱ्या धुळे येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. हा सापळा दिनांक १९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कुसुंबा गावातील मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी (५५, कुसूंबा, ता.धुळे) असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे.

तक्रारदार महिला शिक्षिका या सोशल ॲण्ड कल्चरल असोशिएशन, कुसुंबे ता.जि.धुळे संचलित आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी सर्व कार्यरत शिक्षकांकडून शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांपोटी प्रत्येकी एक हजार तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आठशे रुपये मागितले होते मात्र त्यास तक्रारदार महिला उपशिक्षकेने विरोध दर्शवल्याने त्यांना हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करू देण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता. संबंधित महिला उपशिक्षिकेला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.

दिनांक १९ मार्च रोजी सकाळी मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी दालनात एक हजारांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. धुळे तालुका पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हा सापळरा लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंतिजसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *