‘उत्सव निवडणुकीचा – अभिमान देशाचा’ लोगोच्या वापरातून मतदानासाठी प्रोत्साहित करावे : जिल्हाधिकारी


दक्ष न्यूज : अमित कबाडे

नाशिक : भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच घोषित होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ करिता “उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा” हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोच्या वापरामुळे नागरिकांमध्ये मतदान प्रक्रियेप्रती नवचैतन्य निर्माण होऊन जास्तीत जास्त नागरिक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहीत होतील. या लोगोचा वापर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसोबतच सर्व मतदारांनी देखील सोशल मीडिया व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब या सारख्या माध्यमाद्वारे संपर्क साधतांना तसेच स्टेटस ठेवण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात आपण वेगवेगळे सण समारंभ मोठ्या उत्साहाने, आनंदाने सहभागी होऊन जल्लोषात साजरे करत असतो. याच पार्श्वभूमिवर आपल्या देशात संपन्न होणारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या भारतासाठी एक उत्सव सोहळाच आहे आणि आपल्याकरिता ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले बहुमुल्य मत नोंदविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आता लोकसभा निवडणुकीची जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र लोगो विकसित करण्यात आला असून या लोगोचा वापर सर्वसाधारण पत्रव्यवहार करतांना कुठलाही बदल न करता करण्याच्या सूचना आयोगाकडून देणेत आल्या आहेत. यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सूचनापत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना निर्गमित करणेत आले असल्याचेही जिल्हा निवडणूक शाखेकडून शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद देवून “उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा” अभियान यशस्वी करावे. या निवडणुकीत मतदान करणेसाठी जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी आणि मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रमाद्वारे जनजागृती करणेत येत आहे. स्वीप कार्यक्रमाच्या जनजागृतीला प्रतिसाद देत, मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व सहभाग नोंदविल्याने आपली मतदार नोंदणी वाढलेली आहे. याचप्रमाणे आता आवश्यकता आहे मतदानासाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *