ओझरखेड डावा कालव्याची कामे जलसंपदाच्या बांधकाम शाखेमार्फत तात्काळ पूर्ण करावीत- भुजबळ


नाशिक: (जिमाका वृत्तसेवा)

ओझरखेड डावा कालव्याच्या किमी ४९ ते ६३ व त्यावरील वितरीकांच्या अपूर्ण कामांमुळे सिंचनासाठी अडचणी निर्माण होत आहेत, ही सर्व अपूर्ण कामे जलसंपदा विभागाच्या बांधकाम शाखे मार्फत (नांदूरमध्यमेश्वर कालवा विभाग) पूर्ण करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

यासंदर्भात आज भुजबळ फार्म येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, सदर अपूर्ण कामांमुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. स्थानिक पाणी वापर संस्था व संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत कार्यकारी अभियंता नांदुरमध्यमेश्वर कालवा विभाग यांना वेळोवेळी लेखी निवेदने दिली आहेत. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकच्या कार्यकारी अभियंता व प्रशासक यांच्या अहवालाप्रमाणे ओझरखेड (जि.नाशिक) डावा कालवा किमी ४९ ते ६३ व त्यामधील वितरिकांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत.

तसेच ओझरखेड डावा कालवा किमी ४९ ते ६३ चा किमी ४९ येथील संकल्पित विसर्ग १०९ क्युसेक्स इतका आहे. तथापि, किमी ४९ येथे ६० क्युसेक्स विसर्ग असतांनाच कालवा सा.क्र. ५१०० ते ५१९५ दरम्यान निरीक्षण पथाकडील मुक्तांतर (FB) ०.१० इतका आढळून आले तसेच निरीक्षण पथाकडील इनलेट मधून पाणी शेजारील शेतात जाते, त्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने प्रवाहित करणे शक्य नाही. काही ठिकाणी खोदकाम संकल्पित तलांकापेक्षा जास्त झाल्याने सदर ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्यामुळे पाझर वाढून वहनव्यय वाढतो. काही ठिकाणी खडकातील खोदकाम अर्धवट असून ०.३० मीटर इतके कठीण खडकांचे उंचवटे ठिकठिकाणी आढळून आलेले आहेत. ओझरखेड डावा कालवा किमी ४९ ते ६३ च्या दरम्यान ०९ वितरिका,०२ थेट विमोचक व ०१ एस्केपचा समावेश आहे. प्रत्येक वितरिकेच्या मुखाशी क्रॉस वॉल नसल्याने दगड मातीचा आडवा बांध टाकावा लागतो आहे, त्याबातच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

गेट नादुरुस्त आहे, काही वितरीकांना हेड रेग्युलेटरचा पाईप तुलनेत कमी क्षमतेचा व वितरीकेची लांबी जास्त असल्यामुळे मिळणारा विसर्ग पाणी पोहोचण्यास पुरेसा नाही. चाऱ्यांचे भराव अपूर्ण आहेत, तसेच काही चाऱ्यांची कामे झालेली दिसत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या भरावातून पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अपेक्षित विसर्ग मिळत नाही. लाभक्षेत्रात चाऱ्यांवर पोट चाऱ्यांची कामे तात्काळ करावीत. वितरिका क्र. २६ व ३४ ची पाणी चाचणी अर्धवट झालेली आहे. वितरिका क्र. २९, ३१, ३४ च्या शेवटच्या टप्प्यात भूसंपादन व चाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करून ओझरखेड डावा कालवा पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांसाठी कसा उपयोगात येईल त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे अशा सूचना यावेळी दिल्या.

यावेळी ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाची चतुर्थ सुप्रमा शासनाकडे मंजुरी साठी सादर करण्यात आली असून या सुप्रमा मध्ये ओझरखेड कालव्याच्या अपूर्ण कामांचा समावेश आहे. तसेच सुप्रमाला मान्यता मिळेपर्यंत ही कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तातडीने सुरू करण्यात येतील अशी माहिती अधीक्षक अभियंता नाईक यांनी दिली.

  • पालखेड व मांजरपाडा बाबतही झाली चर्चा

दरसवाडी ते डोंगरगाव मधील शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. भूसंपादनाचा योग्य तो मोबदला देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. मांजरपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. कालवा फुटलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी पालखेड व मांजरपाडा प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या चर्चेत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांसमवेत मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *