दक्ष न्यूज |”हातामध्ये काठी… पण मनामध्ये प्रकाश!” – नाशिकमध्ये अंध व हॅंडीकॅप मुलांच्या मातांना ‘नारीरत्न’ पुरस्काराने सन्मानित
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक | अश्रूंना शब्दांची गरज भासत नाही, आणि संघर्षाला ओळख मिळते ती केवळ त्याच्या परिणामांमधून! असाच एक प्रेरणादायी सोहळा नाशिकच्या यशवंत मंगल कार्यालयात अनुभवायला मिळाला, जिथे अंध व हँडीकॅप मुलांच्या मातांना आणि त्यांच्यासोबत अथक मेहनत करणाऱ्या शिक्षक, केअरटेकर महिलांना ‘नारीरत्न पुरस्काराने’ गौरवण्यात आलं.

या पुरस्कार सोहळ्याने समाजात “नारी तू नारायणी” या संकल्पनेचं सत्य रूप प्रकट केलं. अंध मुलांची काळजी घेणाऱ्या मातांचं जीवन, त्यांचा दिवसेंदिवसाचा संघर्ष आणि समाजासाठी त्यांनी उभारलेला आदर्श – यामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेलं.
उपस्थित मान्यवर आणि प्रेरणादायी सादरीकरण
या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुशमा परांजपे यांनी अतिशय हृदयस्पर्शी शैलीत केलं. प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. सभापती गणेश गीते, डाॅ. भाग्येश मंत्री, रील्स स्टार साहील अन्सारी, तसेच PCCDA चे उपाध्यक्ष किशोर सपकाळे, खजिनदार रविंद्र पाटील सर यांचा गौरवशाली सहभाग होता.
संघर्षातून निर्माण झालेल्या विजयी कहाण्या
या पुरस्काराच्या माध्यमातून केवळ एका पुरस्काराचा नव्हे तर एका जीवघेण्या संघर्षाचा आणि मातृत्वाच्या अपार शक्तीचा गौरव करण्यात आला. “मुलं अंध आहेत, पण त्यांचं भविष्य उज्वल असावं म्हणून झटणाऱ्या या मातेचं सामर्थ्यच खरे ‘नारीरत्न’ आहे!” – अशी भावना उपस्थित सर्वांच्या मनात दाटून आली.
सकारात्मकतेचं आयोजक केंद्र
हा सामाजिक भव्य सोहळा ‘श्रमिक बहुउद्देशीय संस्था’च्या अध्यक्ष वैशाली सपकाळे आणि ‘यश क्लासेस’ चे संस्थापक किशोर सपकाळे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. यामध्ये चैत्राली परांजपे, नुपुर सपकाळे आणि मैथली सपकाळे या विद्यार्थिनींनीही आयोजनाच्या विविध टप्प्यांवर मोलाची भूमिका बजावली.
संघर्षांना सलाम… सन्मानाला समर्पण!
कार्यक्रमाच्या शेवटी “नारी तू नारायणी” हे शब्द केवळ घोषणेत नव्हते, तर संपूर्ण सभागृहात ते भावनांच्या लाटेसारखे घुमत राहिले. एक वेगळा आदर्श उभा करणारा हा कार्यक्रम उपस्थित प्रत्येकासाठी एक जीवनमूल्यांचं दर्शन ठरला.