दक्ष न्यूज| नाशिक कुंभमेळ्याने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार – ललित गांधी
नाशिक : येत्या नाशिक कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष नाम. ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळालेल्या सकारात्मक परिणामाचा दाखला देत गांधी म्हणाले, “नाशिकच्या कुंभमेळ्याचा फायदा केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला होईल.” महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गांधी बोलत होते.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर विशेष नियोजन करत असून येत्या पंधरवड्यात या संदर्भात विस्तृत सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना गांधी यांनी, “कुंभमेळा हे मोठे आव्हान असले तरी त्याचबरोबर ही एक सुवर्णसंधी आहे. यासाठी नाशिकमध्ये आवश्यक असणाऱ्या यंत्रणांची उभारणी करणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरते नाही तर दीर्घकालीन विकासाचे उपाय योजावेत,” असे स्पष्ट केले.
गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचा आढावा घेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी व औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्नांवर सातत्याने काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच, एलबीटी कर रद्द करणे, प्लास्टिकबंदी मागे घेणे, कोरोना काळातील व्यापाऱ्यांसाठी रिफंड मिळवून देणे आदी मुद्द्यांवर चेंबरने यश मिळविल्याचेही त्यांनी नमूद केले.
- व्यापारी आणि उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार
महाराष्ट्र चेंबरच्या बिझनेस नेटवर्किंग फोरमच्या कार्याचा गौरव करत गांधी म्हणाले की, “नाशिकमध्ये स्थापन केलेला बिझनेस फोरम हीच संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवली जाणार आहे.”कार्यक्रमात चेंबरच्या मासिआ बिजनेस नेटवर्किंग फोरमच्या नविन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासात महाराष्ट्र चेंबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे सांगितले. कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबरचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, माजी विश्वस्त विलास शिरोरे, नाशिकमधील विविध व्यापारी व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- नाशिकचा कुंभमेळा – राज्याच्या विकासासाठी टप्पा ठरणार
गांधी यांच्या वक्तव्यामुळे येत्या कुंभमेळ्यासाठी नाशिक व महाराष्ट्रातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्र अधिक सकारात्मक तयारीकडे वाटचाल करताना दिसत आहे.