दक्ष न्यूज – सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडला,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत पोवाडा, नाट्य, संगीत, नृत्य, माहितीपट अशा विविध सांस्कृतिक प्रयोगात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सुरवातीला गणेश वंदना तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले.
या कार्यक्रमास नाट्य परिषद नाशिकचे कार्यवाह सुनिल ढगे, लक्ष्मण सावजी, रवींद्र पाटील, श्रीकृष्ण कला फाऊंडेशनचे संचालक कृष्णाजी कदम, अभिनेत्री तथा समन्वयीका मीनाताई वाघ, जेष्ठ संगीतकार व गीतकार सुधीर सराफ, राज्य नाट्य परिषद नाशिकचे समन्वयक श्री. थोरात, समन्वयक राजेश जाधव, के.के वाघ कॉलेजचे प्राचार्य मकरंद हिंगणे, कलाकार संजय भुजबळ, कथकनृतिका सुमुखी यात्मी, के.के वाघ महिला वसतिगृह अधीक्षिका उमा हांडे, जयप्रकाश पुरोहित हे उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी वंदना व गौवरपर नृत्याचे सादरीकरण झाले. यानंतर अनुक्रमे जात्यावरील ओवी, कथक नृत्य अविष्कार, ‘अहिल्या मी होणार गं’ गीत, लघुनाटीका, शेतकरी नृत्य, शाहिरी, अहिल्यादेवी नृत्यनाटिका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरव नृत्य, धनगरी ओवी, एकपात्री प्रयोग, धनगरी नृत्य, करपल्लवी गोंधळी व गोंधळ अशा विविध रचनांमधून श्रीकृष्ण काला फाऊंडेशनच्या कालाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या आदर्श स्त्रीशक्तीचे प्रतीक व न्यायप्रिय शासक होत्या.त्यांनी काशी विश्वनाथ, सोमनाथ, रामेश्वरम, मथुरा, आयोध्या यासारखी मंदिरांची पुर्नबांधणी आणि धर्मसंस्कृती व पंरपरा यांचे रक्षण केले. आजही त्यांचे विचार समाजासाठी तितकेच प्रेरक व प्रेरणादायी असल्याचे श्रीकृष्ण कला फाऊंडेशनचे संचालक श्री. कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.