राधाष्टमी निमीत्त श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिरात विशेष शृंगार


नाशिक: चैत्राली अढांगळे

  • इस्कॉन मंदिरात ऑनलाइन राधाष्टमी जल्लोषात


आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिक मध्ये श्री राधाष्टमी, म्हणजेच श्रीमती राधारानीचा जन्मदिवस राधे राधेच्या जयघोषात व भाविकांच्या ऑनलाइन उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा करण्यात येणारा हा दुसरा मोठा महोत्सव आहे.

Iskcon Nashik, Today’s Special Radhashtami Shringar Darshan

राधाष्टमी निमित्त मुंबईहून श्रीमान हरिपार्षद प्रभू नासिकला आले होते. त्यांनी प्रवचनातून भाविकांना उद्बोधित करताना म्हटले की, श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे; परंतु राधा रानी कृपा एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. राधाराणीच्या कृपेची याचना करीत जर कुणी अश्रू ढाळले, तर त्याला आयुष्यभर दुःखाश्रू ढाळावे लागणार नाही. राधाराणी व श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम हे भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे, याचेही वर्णन त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने केले. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद असल्याने फक्त निवासी भक्त हे मंदिरात उपस्थित होते व सर्व भक्तांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे मंदिराच्या फेसबुक व यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले होते ज्याला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला.

राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधा कृष्णाच्या विग्रहांची सजावट करण्यात आली होती. महोत्सवाला सकाळी पाच वाजता मंगल आरतीपासूनच सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व श्रीमद्भागवत प्रवचन झाले. राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन करण्यात आले. श्रीश्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. सायंकाळी ५६ पदार्थाचा नैवेद्य भगवंतांना अर्पण करण्यात आला व महाआरती करण्यात आली.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, माधव कृष्ण प्रभू, गोपालानंद प्रभू, रणधीर कृष्ण प्रभू, जानकीनाथ प्रभू, मारुतीप्राण प्रभू, आनंद चैतन्य प्रभू, सुमेध पवार, अमित कोल्हे, नादिया कुमार दास आणि इतर कृष्णभक्तांनी अथक परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *