दक्ष ब्रेकिंग न्यूज – टोळक्याचा हल्ला; भर रस्त्यात युवकाची निर्घृण हत्या
दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रवीण सुरुडे
नाशिक: संत कबीर नगर येथे भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण राम बंडी (रा. कामगार नगर, सातपूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, अरुण राम बंडी हा रात्री संत कबीर नगर येथे आला असता, त्याचे सातपूरच्या एका टोळक्यासोबत पूर्वीपासून वाद होते. याच कारणावरून टोळक्याने त्याला घेरून धारदार शस्त्रांनी सपासप वार करत जागीच ठार मारले. हल्लेखोरांनी अरुणवर गंभीर वार केले, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. हल्लेखोरांनी दोन दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. परिस्थिती गंभीर बनत असल्याने दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांना तैनात करण्यात आले.
पोलीस कारवाई आणि तपास सुरू
गंगापूर पोलिसांनी तातडीने परिसरात शोधमोहीम राबवून हल्ल्यातील काही जणांना ताब्यात घेतले आहे, तर एक जण फरार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या हत्येच्या मागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.