जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण होतील : पालकमंत्री छगन भुजबळ


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा अभ्यास करता ऑक्सिजन हा सर्वात महत्वपूर्ण घटक असल्याचे निदर्शनास आल्याने ऑक्सिजन निर्मीतीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत पाच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित ऑक्सिजन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स, ऑक्सिजन सिलेंडर, बेडस तसेच बालरुग्णांसाठी टास्क फोर्स तयार करून पूर्व तयाारी करण्यात आली आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी ज्यांना घरी राहून उपचार घेणे शक्य असून तेथे आवश्यक सर्व व्यवस्था आहे, अशा रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांची घरी व्यवस्था होणार नाही अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठीच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात लसीकरणाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत एकूण 29 लाख 69 हजार 011 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 22 लाख 5 हजार 146 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 7 लाख 63 हजार 865 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे एकूण 24 ऑक्सिजन प्रकल्पांपैकी 5 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प कार्यान्वित झाले असून येत्या आठवड्यात 10 प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री यांना दिली.

  • अतिवृष्टीबाधित नांदगाव येथील पंचनामे शासन मापदंडाप्रमाणे पूर्ण करावेत

नांदगांव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांना द्यावयाच्या सहाय्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी व अन्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शासन मापदंडाप्रमाणे पंचनामे तातडीने पूर्ण करून जिल्हा नियोजन समितीकडील काही अंशी निधी तातडीच्या कामांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले. त्याचप्रमाणे तेथील पूर परिस्थितीमुळे रोगराई व साथीचे आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *