दक्ष न्यूज – मंत्री माणिकराव कोकाटे यांना तूर्तास दिलासा…
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रे बनवून मुख्यमंत्री कोट्यातील निवासस्थान मिळविले होते. याबाबतची तक्रार माजी मंत्री आणि सिन्नरचे माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी केली होती.याबाबत सुनावणी पूर्ण होऊन सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेच्या विरोधात कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलेले होते. त्याची आज (बुधवारी) न्या. जीवने यांच्यासमोर कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये ना. माणिकराव कोकाटे यांना अपील पूर्ण होईपर्यंत शिक्षेसाठी स्थगिती दिलेली असून, न्यायालयाने या अपिलासोबत दाखल झालेल्या तीन याचिका रद्द केलेल्या आहेत.

कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या बाबतीत सुरू असलेली सुनावणी ही यापुढे नाशिकच्या न्यायालयात होणार असल्याचे अॅड. जयंत जायभावे यांनी सांगितले. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस स्थगिती देण्यात आल्याने तूर्तास
ना. माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे.