दक्ष न्यूज – पत्रकारांचा सन्मान सोहळा; गोदाआरतीचे स्वरूप अधिक भव्य होणार ,नाशिकचे ब्रॅण्डिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्याचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा निर्धार
दक्ष न्यूज प्रतिनिधी
नाशिक : नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.त्याचप्रमाणे नाशिक मधील गोदाघाट देखील प्रसिद्ध आहे.लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात गोदाकाठी दररोज गोदावरी ची आरती होते.गोदा आरती प्रसंगी निर्माण होणारी आध्यात्मिकता आणि भारून टाकणारे वातावरणाने मन प्रसन्न होते.
त्याच पार्शवभूमीवर गोदावरी आरतीचे स्वरूप अधिक भव्य करून काशी, प्रयागराज, अयोध्या या तीर्थक्षेत्रांसारखे नाशिकचे ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे . गोदावरी आरती उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने नाशिक मधल्या पत्रकारांचे स्नेहसंमेलन आणि सत्कार सोहळा आयोजित केला होता. यामध्ये गेल्या वर्षभरातले अनुभव कथा आणि पत्रकारांशी मुक्त संवाद यांचा समावेश होता.
गेल्या वर्षभरात पत्रकारांनी समितीच्या विविध उपक्रमांना दिलेल्या प्रसिद्धी आणि पाठिंब्याबद्दल सेवा समितीने पत्रकारांचा विशेष मानपत्र देऊन सन्मान केला. या सत्कार सोहळ्यास एनालायझर युट्युब चॅनेलचे संपादक सुशील कुलकर्णी आणि द फोकस इंडिया वेब पोर्टलचे संपादक विनायक ढेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला रामचरित गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी प्रास्ताविकात सेवा समितीने गेल्या वर्षभरात केलेल्या 400 हून अधिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या आरती उपक्रमातून प्रेरणा घेऊन प्रकाशा आणि धुळे या दोन शहरांमध्ये तापी नदीची आरती देखील सुरू झाली आहे, अशी माहिती जयंत गायधनी यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी सेवा समितीला सामना करावा लागत असलेल्या समस्यांचाही उल्लेख केला. नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी सेवा समिती महिन्यातल्या पहिल्या रविवारी स्वच्छता उपक्रम करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
दक्ष न्यूज चे संचालक संपादक करणसिंग बावरी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला ,यांच्या सह विविध दैनिक, न्यूज चैनल, छायाचित्रकार, डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या 50 पेक्षा जास्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
सातत्य आणि चिकाटीने गोदावरी आरती उपक्रम सुरू ठेवून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आणि नाशिककरांनी उत्तम प्रथा परंपरा जपली आहे, अशा शब्दांमध्ये विनायक ढेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या सोहळ्यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, पत्रकार संपर्कप्रमुख राजेंद्र फड, सन्मान सोहळ्याचे प्रमुख धनंजय बेळे, युवा समितीचे प्रमुख चिराग पाटील, आर्किटेक्ट शैलेश देवी, डॉ. अंजली वेखंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.