दक्ष न्यूज – अर्थमंत्र्यांनी घोषणा करून ४ वर्ष झाले तरी मेट्रो बाबत कोणतीच कार्यवाही नाही
आगामी कुंभमेळ्याच्या आधी मेट्रो पूर्णत्वास यावी अशी खासदार राजाभाऊ वाजे यांची मागणी
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
नाशिक : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२१च्या अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोची घोषणा केली होती. मात्र, ४ वर्ष झाले तरी त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री मनोहर लाल यांची भेट घेत त्याबाबत सवित्तर चर्चा करत नाशिक मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याची मागणी केली. टाईम बाऊंड काम केल्यास आगामी कुंभमेळ्याच्या आधी प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास येईल असे मतं यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मांडले.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१च्या अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोची घोषणा केली होती. यानुसार नाशिक मेट्रो प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी अंदाजे २२,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. ज्यात ३२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार होता तर त्यात ३२ स्टेशन प्रस्तावित होते. मात्र, याबाबत फक्त घोषणा झाली आणि पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंत्री मनोहर लाल यांना निदर्शनास आणून दिले.
आगामी सिहस्थ कुंभमेळ्यात शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिकचा भार येणार आहे. तसेच, नाशिकचा झपाट्याने होणारे विस्तार, त्यातून निर्माण होत असलेले सार्वजनिक वाहतूक, ट्राफिक जाम आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. नाशिक सारख्या झपाट्याने वाढत असलेल्या शहराला मेट्रोची अत्यंत गरज असून त्या प्रकल्पास गती द्यावी अशी विनंती खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली.
- आधीचे प्रकल्प पूर्ण होऊ द्या
सद्यस्थितीत देशात विविध ठिकाणी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून ते पूर्णत्वास आल्याशिवाय नवीन प्रकल्प हाती न घेण्याचं केंद्र सरकारच धोरण असल्याचे मंत्री मनोहर लाल यांनी सांगितले. तसेच, नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले.
नाशिकची वाढती लोकसंख्या, शहराचा वाढता विस्तार, नव्याने उद्भवू घातलेलं वाहतूक कोंडीच संकट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील अतिरिक्त भार लक्षात घेता नाशिकमध्ये मेट्रो होणे अत्यंत गरजेचे आहे. मागील ६ महिन्यात सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकारकडे सातत्याने तगादा लावून तसेच राज्य सरकारच्या मदतीने मेट्रो प्रकल्प होण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकली जात आहेत. : खासदार राजाभाऊ वाजे