दक्ष न्यूज – गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य – ना. विखे पाटील
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : “शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात आत्मबळ आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे करीत आहेत. हे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे,” असे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. ते जागतिक कृषी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही, “या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन मिळते,” असे सांगत सेवामार्गाच्या उपक्रमांचे कौतुक केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मानवतावादी सेवा कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ग्रामसेवक मांदियाळीने महोत्सवाची सांगता
पाच दिवस सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची सांगता सरपंच-ग्रामसेवक मांदियाळीने झाली. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार सीमाताई हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मी कृषी मंत्री असताना सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाची सुरुवात झाली. आज १४ वर्षे हा महोत्सव अखंड सुरू आहे, ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे.”
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “हिमालयात अनेक योगी तपश्चर्या करत आहेत. मात्र, गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे जनमानसात राहून लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य करतात. या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.”
शेतकऱ्यांसाठी बहुविध उपक्रम
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन करताना, “शालेय अभ्यासक्रमात शेतीचा विषय समाविष्ट करावा,” अशी मागणी केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणूनच जागतिक कृषी महोत्सव आयोजित केला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी आणि सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी सेवामार्ग विविध उपक्रम राबवतो.”
महत्त्वपूर्ण उपक्रम आणि विक्रमी सहभाग
- शेतकरी विवाह सोहळा – महोत्सवात ८ शेतकरी जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. विवाहेच्छुक ५०० मुला-मुलींची नोंदणी झाली.
- महा रोजगार मेळावा – १६०० युवक-युवतींनी नोंदणी केली, ३६३ उमेदवारांना जागेवरच नोकरी नियुक्तीपत्रे मिळाली, तर ७०० जणांना मुलाखतीनंतर रोजगार मिळणार आहे.
- परिसंवाद आणि कार्यशाळा – पर्यावरण, दुर्गसंवर्धन, सायबर सुरक्षा, आधुनिक शेती आणि पशुधन संवर्धनावर परिसंवाद झाले.
आदर्श शेतकरी व कृषी माऊली पुरस्कार वितरण
महोत्सवात १६ शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार, तर २२ शेतकऱ्यांना कृषी माऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महोत्सवाची वैशिष्ट्ये
- आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती उपकरणांचे प्रदर्शन
- सेंद्रिय शेती व बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल्स
- शेतीशी संबंधित माहितीपट आणि कीर्तन सत्र
- प्रदर्शनाला मान्यवर तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुरुपुत्रांनी केले महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन
कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे आयजी दत्तात्रय कराळे, गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे, गुरुपुत्र आबासाहेब मोरे उपस्थित होते. गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांनी सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सेवाभावी प्रकल्पाची माहिती दिली.
संस्मरणीय जागतिक कृषी महोत्सव
युथ फेस्टिवलच्या मैदानावर उभारलेला भव्य शामियाना, स्वयंसेवकांचे नियोजन, पार्किंग व्यवस्था, फूड पार्क दालन, तसेच शेतकरी व गोवंशाचे प्रतिकात्मक शिल्प यामुळे हा कृषी महोत्सव संस्मरणीय ठरला.
— दक्ष न्यूज