दक्ष न्यूज -“नवीन पिढीस शुद्ध हवा, पाणी व पर्यावरण देणे ही आपली जबाबदारी” – पंकजा मुंडे
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : “येणाऱ्या नवीन पिढीस शुद्ध हवा, पाणी व पर्यावरण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या कार्यात सतत सक्रिय आहे. पर्यावरण विभागाच्या प्रमुख म्हणून आणि व्यक्तीशः मी कायम सहकार्य करणार असून, शासन आणि सेवा मार्ग मिळून ही चळवळ पुढे नेऊ,” अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी दिली.

त्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने नाशिक महानगरात सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवातील पर्यावरण व दुर्गसंवर्धन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
विश्वास आणि विज्ञान यांची सांगड गरजेची – पंकजा मुंडे
“श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग चळवळ विज्ञान आणि श्रद्धेची सांगड घालण्याचे महत्त्व शिकवते. पूजा, अर्चना आणि धर्म या श्रद्धेच्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला शिकविण्याचे कार्य येथे होत आहे. यातून नव्या पिढीचा सुयोग्य विकास होईल. मात्र, त्यांना सकस धान्य व शुद्ध पाणी मिळावे यासाठी आता गांभीर्याने विचार करावा लागेल,” असे त्या म्हणाल्या.
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाचे ठोस प्रयत्न
“पर्यावरण, प्रकृती, पशुधन ही सर्व खाती माझ्याकडे असून, त्याद्वारे प्रभावी उपाययोजना राबवण्याची संधी आहे. गोवंश वाचवण्यासाठी तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमांसाठी ठोस पावले उचलणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सेवा मार्गाच्या वृक्षारोपण उपक्रमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला आणि गोपीनाथ गडाच्या विकासापूर्वी पाच हजार झाडे लावून पर्यावरण संवर्धनाची घेतलेली काळजी याचा दाखला दिला.
ग्रामीण युवकांसाठी कृषीपूरक उद्योग महत्त्वाचे
ग्रामीण युवकांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन यांसारखे छोटे-मोठे उद्योग करून आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकार यासाठी आर्थिक मदत करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यासाठी नाशिक प्रयागराजचा आदर्श घेणार
“प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा अनुभव लक्षात घेऊन, नाशिक कुंभमेळ्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता व नियोजन आदर्शरित्या करण्यात येईल,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
पुष्पगुच्छाऐवजी ‘बीज भेट’ संस्कृतीचा आग्रह
यावेळी आयोजक आबासाहेब मोरे यांनी नामदार पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छाऐवजी बी-बियाण्यांची छोटी पिशवी देऊन स्वागत केले. या संकल्पनेचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, “यापुढे सर्वांनी पुष्पगुच्छाऐवजी बी-बियाणे देण्याची प्रथा सुरू करावी, जेणेकरून पर्यावरण संरक्षणाला हातभार लागेल.”
उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. नामदार पंकजा मुंडे यांनी ३५ मिनिटे संपूर्ण प्रदर्शनाला भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि विशेषतः महिला स्टॉलधारकांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
उपस्थित मान्यवर
या वेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार सीमा हिरे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, केंद्रीय भूजल वैज्ञानिक प्रा. उपेंद्र धोंडे, सह्याद्री फार्मचे मंगेश भास्कर, संजय वायाळ, डॉ. श्रीहरी पितळे महाराज, कृषी पर्यावरण अभ्यासक कीर्ती मंगरूळकर, पशुसंवर्धन सहआयुक्त बाबुराव नरवडे, सहाय्यक आयुक्त सुनील हांडे, उपसचिव निवृत्ती मराळे, भाजपचे गिरीश पालवे, प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
— दक्ष न्यूज