दक्ष न्यूज – अशोकस्तंभ येथे ४५ फूट सिंहासनावर शिवरायांची भव्य मूर्ती
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमधील अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त ४५ फूट उंच सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे नाशिककरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

गेल्या काही वर्षांत अशोकस्तंभ येथे शिवजयंतीनिमित्त भव्य शिवमूर्ती उभारण्याची परंपरा सुरू आहे. २०२३ मध्ये ६१ फूट आणि २०२४ मध्ये ६५ फूट उंच शिवमूर्ती उभारण्यात आली होती. त्या विक्रमाची नोंद ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली होती. यंदा मात्र शिवरायांचा पुतळा ४५ फूट उंच सिंहासनावर विराजमान होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी मागील तीन महिन्यांपासून काम सुरू असून, सुप्रसिद्ध शिल्पकार हितेश पाटोळे आणि रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती समितीने दिली.
या पुतळ्यामुळे अशोकस्तंभ परिसर पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होईल आणि शिवभक्तांसाठी एक ऐतिहासिक क्षण साकार होणार आहे. शहरभरात या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली असून, शिवभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्याचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत.