दक्ष न्यूज – जागतिक कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या आठ जोडप्यांचे शुभ विवाह..!
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
- ५०० हून अधिक विवाह नोंदणी; सेवामार्गाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन, प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा भव्य विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

या विशेष सोहळ्यात आठ जोडपी विवाहबद्ध झाली, तर ५०० हून अधिक उपवर मुला-मुलींनी विवाहासाठी नोंदणी केली. या मंगल सोहळ्यासाठी गुरुमाता मंदाकिनी (काकूसाहेब) श्रीराम मोरे आणि गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शेती व समाजासाठी सेवामार्गाचा अभिनव उपक्रम
शेती आणि शेतकऱ्यांविषयी समाजात अनास्था दूर व्हावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सेंद्रिय शेतीचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने आयोजित केलेल्या जागतिक कृषी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
या महोत्सवाअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा भव्य विवाह सोहळा संपन्न झाला.
ही जोडपी झाली विवाहबद्ध
➡️ पंकज मुरमुरे – खुशी बावणे (शिर्डी)
➡️ भूषण देवकर – वृषाली मवाळ (शिर्डी)
➡️ आदित्य देशमुख – पल्लवी देवकर (अहिल्यानगर)
➡️ सागर गावित – कल्याणी कोकणे (नंदुरबार)
➡️ धनंजय मैसाने – साक्षी गाडगे (अकोला)
➡️ शुभम सारडा – सारिका बजाज (परभणी)
➡️ रचित सहस्त्रबुद्धे – शुभांगी कारसर्पे (परभणी)
➡️ प्रशांत अहिरे – दीपाली (नाशिक)
गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व विधीवत पार पडलेल्या या सोहळ्यात, नवदांपत्यांना सेवामार्गातर्फे कन्यादान म्हणून भांड्यांचा संच भेट देण्यात आला. तसेच, गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांनी या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे विशेष महत्त्व स्पष्ट केले.
शेतकरी समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या विवाह नोंदणी उपक्रमाला शेतकरी कुटुंबांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, पुढील वर्षी हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा निर्धार सेवामार्गाने व्यक्त केला आहे.
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचा हा सामाजिक उपक्रम केवळ शेतकरी समाजासाठी नव्हे, तर समाजातील विवाह संस्था बळकट करण्यासाठीही एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.