नाशिकमहाराष्ट्र

दक्ष न्यूज – जागतिक कृषी महोत्सवाचे भव्य उद्घाटन; कृषी मंत्री कोकाटे यांची उपस्थिती


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

  • गुरुमाऊलींच्या सेवाकार्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांशी हितगुज साधणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

नाशिक : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण थेट शेतीच्या बांधावर जाऊन संवाद साधणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कृषिमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

यावेळी कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, “परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे ज्या पद्धतीने सेवेकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांशी हितगुज साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील नऊ विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकांचे नियोजन पूर्ण झाले असून, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.”

शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही, उत्पादन खर्च वाढतो, हवामान बदलामुळे शेती संकटात येते – या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास त्यांनी थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा,” असेही कोकाटे यांनी जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला.

गुरुमाऊलींचे विचार आणि कृषी महोत्सवाचे महत्त्व

परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “काळी आई आपल्याला अन्नधान्य, फळे, भाजीपाला देते, त्यामुळे तिची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आधुनिक शेती करताना सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याचा पर्यावरण व आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”

शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी मदत व्हावी, उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही दर्जेदार अन्नधान्य मिळावे, या उद्देशाने जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदर्शनातील ठळक घडामोडी

रामकुंड ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य कृषी दिंडीचे आयोजन
दीप प्रज्वलन, माती पूजन व कृषी अवजार पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
ज्ञानेश्वर पाटील, गिरीश राणे, निखिल पेठे, गणेश तांबे यांना ‘कृषी माऊली पुरस्कार’ प्रदान

उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाला आमदार दिलीप काका बनकर, चंद्रकांत मोरे, नितीन भाऊ मोरे, आबासाहेब मोरे, कृषी संचालक सुभाष काटकर, आत्मा संचालक अभिमन्यू काशीद, उपसंचालक विलास सोनवणे, जिल्हा कृषी अधीक्षक जगदीश पाटील, माजी नगरसेवक उद्धव निमसे, शिवसेना नेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पगार, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवीन तंत्रज्ञान आणि शेतीच्या भविष्यासाठी मार्गदर्शन

या महोत्सवात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर परिसंवाद, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *