नाशिक

दक्ष न्यूज- भद्रकाली परिसरातील पानटपरीवर अंमली पदार्थांचा साठा जप्त – तरुण वर्गाला नशेच्या आहारी लावण्याचा धक्कादायक प्रकार उघड


दक्ष न्यूज : प्रवीण सुरुडे

नाशिक: तरुण वर्गाला नशेच्या आहारी ढकलण्यासाठी अंमली पदार्थ विक्री करणारे पानटपरी चालकांच्या संपर्कात आल्याचे समोर येत आहे. भद्रकाली परिसरातील एका पानटपरीतून भांगेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) मंगळवारी (दि. २८) सायंकाळी कारवाई करत लाखो रुपयांचा साठा जप्त केला.

एनडीपीएस पथकाचे हवालदार बळवंत कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भद्रकालीतील शिवशक्ती चौकातील संतोष पानटपरीवर संशयास्पद विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पानटपरी चालक योगेश संतोष डोईफोडे (वय २७, रा. गणेशनगर, पंचवटी) हा सीलबंद पाकिटांतून “तुफानी मदन मोदक वटी” नावाच्या भांगयुक्त गोळ्या विक्री करत होता. एनडीपीएस पथकाने सापळा रचून योगेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ३,३२५ रुपयांचा भांगेचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी योगेश डोईफोडे याच्यावर आणि संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून, एमडी, गांजा, चरस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.

अशा प्रकारच्या विक्रीतून तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे गंभीर प्रमाण लक्षात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अंमली पदार्थांचा साठा उघडकीस आला असून, पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *