दक्ष न्यूज- भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली
दक्ष न्यूज : संतोष विधाते
दिंडोरी : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या नाशिक विभागातील बैठकीदरम्यान, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके यांनी त्यांची भेट घेऊन दिंडोरी तालुका व मोहाडी गटातील विकासकामांवर चर्चा केली.
दिंडोरी हा आदिवासी तालुका असल्याने अनेकांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. तिडके यांनी घरकुल बांधणीसाठी निधी अपुरा असल्याचे सांगत, वस्तूंच्या वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर घरकुल बांधणीसाठी निधी वाढवण्याची मागणी केली. याशिवाय, ज्याठिकाणी ग्रामपंचायतींना गावठाण नाही, तिथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर करण्याची विनंतीही केली.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना शहरातील मुख्य बाजारपेठेत जागा मिळावी, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी दिंडोरी तालुक्याला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालये नाहीत, त्या ग्रामपंचायतींना निधी देऊन कार्यालय उभारण्यासाठी मदत करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी सर्व विषयांवर लक्ष घालून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीत पिंपळगाव मंडळ अध्यक्ष सतीश मोरे, जानोरी गावाचे सरपंच सुभाष नेहरे, रेवचंद वाघ, राजकुमार वाघ, रवी सूर्यवंशी, शरद गांगुर्डे, सिद्धांत विधाते, ग्रामसेवक कांडेकर, भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण चौधरी, निलेश विधाते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.