दक्ष न्यूज – शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सतर्कतेमुळे लाखोंच्या चोरीचा डाव उधळला
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक | जुने सिडकोतील लेखानगर येथे नाशिक महापालिकेच्या लाखो रुपयांच्या अवजड लोखंडी स्वागत कमानीचे साहित्य चोरीचा डाव शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला आहे. या घटनेमुळे नाशिक महापालिकेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता वाढली आहे.

काय आहे प्रकरण?
जुने सिडको येथील लेखानगर चौकात स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने 80 लाखांहून अधिक रकमेची तरतूद केली होती. कामासाठी लागणारे अवजड लोखंडी सांगाडे 5-6 वर्षांपूर्वी येथे आणून ठेवण्यात आले होते. मात्र, काम अर्धवट राहिल्याने हे साहित्य लेखानगर येथे पडून होते.
शुक्रवारी (17 जानेवारी 2025), अचानक अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने लोखंडी कमानीचे तुकडे कापून, आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-46-F-5126 च्या साहाय्याने साहित्य पळविण्याचा प्रयत्न केला.
प्रविण (बंटी) तिदमे यांची तत्परता
घटनेच्या वेळी शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे हे लेखानगर परिसरातून जात असताना त्यांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी चोरट्यांना रोखले, तसेच चोरीचा व्हिडीओ शूट करून पुरावा तयार केला. तिदमे यांच्या हस्तक्षेपामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली आणि चोरीचा डाव फसला.
महापालिकेची जबाबदारी आणि पुढील कारवाई
महापालिकेच्या मालकीचे लाखो रुपयांचे साहित्य चोरीस जाणे, हे महापालिकेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. तिदमे यांनी याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार करण्याचे स्पष्ट केले आहे. आता महापालिका याबाबत कोणती कारवाई करते आणि चोरांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासन कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिककरांच्या सुरक्षेसाठी सवाल
या घटनेने नाशिक शहरातील महापालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लाखो रुपयांचे साहित्य इतक्या वर्षांपासून निष्काळजीपणे ठेवले जाणे, हे नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे करते.
शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या जागरूकतेमुळे लाखो रुपयांची चोरी टळली असून, त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.