दक्ष न्यूज – कडलवाडी येथील अंधाराला संपवण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा
दक्ष न्यूज प्रतिनिधी : प्रभाकर गारे
त्र्यंबकेश्वर : वाविहर्ष येथील कडलवाडीतील ग्रामस्थांना वीज मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अर्ज, निवेदने आणि विनंत्या करूनही अंधारात राहावे लागत आहे. ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही आदिवासी आणि गरीब कुटुंबांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या यंत्रणेला जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटनेने महावितरण (एमएससीबी) कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

गावकऱ्यांच्या समस्या गंभीर
कडलवाडीतील नागरिकांना रात्रीच्या अंधारात सर्प, बिबट्या, विंचू यांसारख्या वन्य प्राण्यांचा धोका असून, महिलांनाही सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. अंधारामुळे मुलांना अभ्यासात अडथळे येत असून ग्रामस्थांचे जीवनमान संकटात आहे.
सरकारी यंत्रणेला जाब विचारणार
श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान डोखे यांनी याबाबत निवेदन देत सांगितले की, “कडलवाडीतील समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिक अंधाराशी झुंज देत आहेत. आम्ही २ जानेवारी २०२५ रोजी महावितरण कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर मोठा जनआंदोलन उभारले जाईल.”
कार्यकर्त्यांचा पाठिंबा
या मोर्चामध्ये नामदेव बांगरे, सोनू कडली, किशोर वारे, पूनमताई बांगरे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा देत श्रमजीवी संघटनेने समस्या सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे.
ग्रामस्थांची मागणी
- तात्काळ कडलवाडीला वीजपुरवठा सुरू करावा.
- महिलांसाठी सुरक्षिततेची व्यवस्था करावी.
- आदिवासी भागातील वीज पुरवठ्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.