दक्ष न्यूज – बँक ऑफ महाराष्ट्र ठाणापाडा शाखेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा; नागरिकांची मोठी हेळसांड – सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रभाकर गारे
नाशिक: बँक ऑफ महाराष्ट्रची ठाणापाडा शाखा आदिवासी भागातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे महत्त्वाचे केंद्र ठरली आहे. मात्र, या शाखेतील कर्मचारी संख्येअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ठाणापाडा, हरसुल, शिरसगाव, ओझरखेड आणि आसपासच्या ५७ गावांतील नागरिक या शाखेत दररोज मोठ्या संख्येने हजेरी लावतात. शासकीय योजनांसाठी बँक खाते अनिवार्य असल्यामुळे नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

- दिवसभर उभे राहूनही काम न होण्याचे प्रकार
सदर शाखेत कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने, अनेक ग्राहकांना दिवसभर रांगेत थांबूनही आपले व्यवहार पूर्ण करता येत नाहीत. काही नागरिकांना दुसऱ्या दिवशी नंबर लागेल या अपेक्षेने रात्रभर शाखेजवळ मुक्काम करावा लागत आहे. शाखेची जागाही अत्यंत अरुंद असल्याने ग्राहकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही.
- सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते लहुदास बरफ (मु. काकडपाणा, पो. चिंचओहळ, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी बँक प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “आदिवासी भागातील नागरिकांवर ही अन्यायकारक परिस्थिती लादली जात आहे. बँकेत तातडीने पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत आणि शाखेची जागा विस्तारण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.”
- गोरगरीब आदिवासींच्या हितासाठी उपाययोजना गरजेची
शासनाच्या धोरणांनुसार आदिवासी नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी या भागात बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, शाखेतील सुविधांचा अभाव व कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे शेकडो नागरिकांची दररोज हेळसांड होत आहे.
- तत्काळ सुधारणा करण्याची मागणी
नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन विभागीय व्यवस्थापकांनी त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. अधिक कर्मचारी नियुक्त करणे, शाखेच्या जागेचे पुनर्वसन करणे आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे या उपाययोजना तातडीने होण्याची गरज आहे.
संबंधित प्रशासनाने या बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन आदिवासी नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.