सर्व मतदारांनी 100% मतदान करावे यासाठी संपूर्ण निफाड शहरात निफाड नगरपंचायतीतर्फे विविध कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
दक्ष न्यूज : योगेश कर्डीले
निफाड : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे कामकाजास सुरुवात झाली असून दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. सदर निवडणुकीत निफाड शहरातील सर्व मतदारांनी 100% मतदान करावे यासाठी संपूर्ण निफाड शहरात निफाड नगरपंचायतीतर्फे विविध कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, श्री .अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड शहरातील सर्व गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, फळ विक्रेते, दुकानदार, विविध आस्थापना , निफाड रा. प. बस स्थानक येथे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून पुरविण्यात आलेल्या या शुभकरांद्वारे (Mascot) मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

विठोबा या शुभंकरामुळे निफाड नगर पंचायतीच्या मतदान जनजागृती मोहिमेस निफाड शहरातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच शहरातील ज्या परिसरात मागील विधानसभा तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी झाले आहे अशा परिसरात निफाड नगरपंचायतीकडून विशेष मतदान जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली असून याचा एक भाग म्हणून नगरपंचायतिच्या विशेष पथकाद्वारे घरोघरी भेटी देण्यात येत आहेत. सदर भेटी दरम्यान शहरातील नागरिकांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती, मतदान केंद्रावरील सुख सुविधा इ. ची माहिती देण्यात येत असून विविध माहितीपत्रके तसेच बॅनर, पोस्टर द्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मतदान विषयक रांगोळी व पथनाट्याद्वारे देखील शहरात मतदान जनजागृती करणेत आली.शहरातील सर्व मतदारांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या मतदानाचा बहुमूल्य अधिकार बजावून मतदान अवश्य करावे, याविषयी निफाड नगरपंचायत तर्फे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.
(अमोल चौधरी) मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत, निफाड