महापालिकेचे यंदा “मिशन विघ्नहर्ता”


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक काल बोलावली होती. यावेळी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विसर्जनाच्या ठिकाणी टाईम स्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी अॅप तयार करण्यात आले होते. त्यामुळे वेळेचे पूर्वनियोजन करणाऱ्यांना वेगळा मार्ग, तर पूर्वनियोजित वेळ न घेता आलेल्यांना वेगळा मार्ग असे नियोजन करण्यात आले होते. यंदाही अशा प्रकारचे अॅप कार्यान्वित असेलच; परंतु त्याचबरोबर वेळेची नोंदणी केल्यानंतर क्युआर कोड तयार होईल आणि त्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदा विसर्जन स्थळी कृत्रिम तरण तलाव असतीलच; परंतु यंदा प्रथमच फिरते तरण तलाव तयार करण्यात येणार आहेत.

पन्नासपेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या ठिकाणीच अशा प्रकारचे फिरते तरण तलाव उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय दरवर्षीप्रमाणे शाडूमातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच नागरिकांना प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे घरीच विसर्जन करायचे असेल तर अमोनिअम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय पर्यावरणपूरक उत्सवासाठी शाडू मातीची मूर्ती बसविण्यासाठी जागृती करणे, दैनंदिन निर्माल्य संकलन करणे यासंदर्भातही महापालिकेने नियोजन केले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा याकरिता शाडू मातीची मूर्ती तयार करणे, पर्यावरणपूरक आरास तयार करणे व श्री मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करणे आदी कामी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे. नदी प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्तीचे दान स्वीकारण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्वयंसेवी, शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *