अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या तोंडावर संशयित खाद्यतेल व मसालारु. १,९७,३९८/- किंमतीचा संशयित साठा जप्त
दक्ष न्यूज :प्रवीण सुरुडे
नाशिक: सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची देखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील खवा, मावा, तुप, तेल व मिठाईच्या शुध्दतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक ठरेल अशी मिठाई विकली जाऊ नये याकरिता एफडीएकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.सध्या दिवाळी सण असल्याने या सणांमध्ये खाद्य तेलास व मसाल्याची प्रचंड मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस खाद्यतेल मिळावे यासाठी एफडीएने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफडीएची पथके शहरातील खाद्यतेल विक्रेते, रिपॅकर विक्रेते, यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत.अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, अन्नविषबाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन तत्पर असून दिनांक ३०/१०/२०२४ रोजी मे. अग्रवाल अॅण्ड कंपनी, बी २४, अंबड, नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे मिथ्याछाप सुर्यफुल तेलाची विक्री करत असल्याचे आढळले. परिणामी रिफाईंड सुर्यफुल तेल या अन्नपदार्थाचे दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित ७९० लिटरचा साठा किंमत १,२९,५४८/- रु किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
दि. ३०.१०.२०२४ रोजी मे. श्री दत्त एंटरप्रायजेस, सिध्दीविनायक परिसर, पंचवटी, नाशिक या पेढीची तपासणी केली असता सदर पेढी विनापरवाना अन्नपदार्थाचे उत्पादन करुन विक्री करीत असल्याचे आढळले. परिणामी सदर ठिकाणाहून शाही खीर मसाला, टिक्का मसाला, गरम मसाला (लुज) या अत्रपदार्थाचे तीन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित ३२९० पाकिटे व खुल्या स्वरुपातील गरम मसाला २२ किलोचा साठा एकुण किंमत ६७,८५०/- रु किंमतीचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहेसदरचे सर्व अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे.

विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. एस.डी. तोरणे, श्री. जी.एम. गायकवाड, श्री अ.उ.रासकर, श्री एस.जी. मंडलिक यांनी श्री. म.मो.सानप, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थित व श्री. म.ना. चौधरी, सहआयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनात केली.प्रशासनातर्फे सर्व जनतेस व भाविकांना अवाहन करण्यात येते की, सण-उत्सव काळात पेढे, बर्फी, मिठाई इ. खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थासंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा.