शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना; शिक्षणाधिकारीस लाच स्वीकारताना अटक व फरार
नाशिक: अमित कबाडे
- आठ लाख रुपयांच्या लाचप्रकरणी ‘एसीबी’ नं ताब्यात घेतलेल्या व चौकशीनंतर सकाळी हजर रहाण्याच्या हमीवर घरी परतलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी हातावर तुरी दिली आहे. दरम्यान अन्य दोन संशयित म्हणजेच प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते व शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना मात्र न्यायालयाने १३ अॉगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-विर (वय ४४) यांना लाचप्रकरणात चालक व प्राथमिक शिक्षकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ‘एसीबी’ ने तब्बल आठ लाखांची लाच घेताना पकडले आहे. या अगोदरही माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी होत्या.
श्रीमती वैशाली पंकज विर, (वय ४४ वर्षे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक), शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले तसेच पंकज रमेश दशपुते (प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी ता. नाशिक) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत.
ठाणे येथून शहरात दाखल झालेल्या ‘एसीबी’ च्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आठ लाख रुपये स्वीकारताना त्यांच्या चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याला लाचेसंदर्भात विचारणा केली असता त्याने थेट झनकर यांचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन पथक झनकर यांच्या कार्यालयात धडकले. कार्यालयाचे दार बंद करून श्रीमती झनकर यांची चौकशी सुरु होती. या चौकशी नंतर सर्व प्रकार समोर आला.
- नेमका प्रकार कसा घडला
- तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता शिक्षक दशपुते यांनी श्रीमती झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयांची मागणी केली. याबाबत दिनांक २७ अ गॅगस्टला रोजी श्रीमती झनकर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख रुपये घेण्याचे ठरले. तसेच पुढील व्यवहार चालक ज्ञानेश्वर सुर्यवंशी याच्यासोबत करण्याचे सांगितले. त्यानुसार चालकास तक्रारदाराकडून आठ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खातेप्रमुख लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. अनेकांनी याबाबतची खातरजमा करण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
झनकर यांच्यासह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. घराचीही झडती घेण्यात आली. कायदेशीर तयतूदीनुसार, श्रीमती झनकर यांना सकाळी हजर रहाण्याच्या हमीवर घरी सोडण्यात आले. मात्र सकाळी हजर न होता त्या फरार झाल्याने ‘एसीबी’ लाही धक्का बसला. वैशाली झनकर-वीर यांचा परिवार राजकीय पक्षाशी संबधित असून त्यांच्या फरार होण्याने उलटसुलट चर्चा सुरु आहे.