दक्ष न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले, तालुका दिंडोरी येथे पालक मेळावा संपन्न
दक्ष न्यूज प्रतिनिधी: सतीश इंद्रेकर
वणी, दिंडोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शाळेची शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली. अध्यक्ष म्हणून संतोष मनोहर गावित, उपाध्यक्ष दिव्या अशोक सोनवणे यांची निवड करण्यात आली. अन्य सदस्यांमध्ये स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी, शिक्षक आणि पालकांचा समावेश होता.
मेळाव्यात शालेय गुणवत्ता विकास, भौतिक सुविधा, शिष्यवृत्ती योजना, आणि राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा यावर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी रविंद्र भरसट यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले.
समाजसेविका कौशल्यताई पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मार्गदर्शन केले व आठवड्यातून एकदा कराटे प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षणाचे धडे मोफत शिकवण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष संतोष गावित यांनी स्पोर्ट गणवेश अंतर्गत टोपी वाटपाची घोषणा केली.
शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजने यांनी शाळेच्या सुशोभीकरणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.