दक्ष न्यूज – 18 वर्षे उलटूनही बऱ्याच कार्यालयामध्ये कायद्याची अंमलबजावणी नाही- संतोष विधाते
- 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यासाठी निवेदन
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी, म्हणून या कायद्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
28 सप्टेंबर हा जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून सर्वच देशांमध्ये साजरा केला जातो परंतु आपल्या महाराष्ट्रातील असे बहुतांश शासकीय कार्यालय आहेत की जे हा दिवस साजरा करत नाही, दरवर्षीप्रमाणे 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून दिनांक 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी असते त्यामुळे यावर्षी 27 सप्टेंबर किंवा 30 सप्टेंबर या दिवशी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी दिंडोरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी, तहसीलदार दिंडोरी यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संतोष विधाते, कार्याध्यक्ष गोरख जाधव, प्रचार प्रमुख सोमनाथ वतार, सक्रीय संघटक दिलीप मोगल, सहप्रचार प्रमुख रमाकांत विधाते, उपाध्यक्ष (महिला विभाग)श्रीमती. वैशाली झोमन, तालुका संघटक (महिला विभाग) श्रीमती रंजना राजदेव, शरद सुर्यवंशी, मधुकर पुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.