दक्ष न्यूज – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रातील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. नाशिकमधील लाभार्थ्यांनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण नाशिकचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

योजनेचे स्वरूप:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेला मान्यता दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने निवडून राज्यातील विविध तीर्थस्थळांवर मोफत यात्रा दिली जाईल. यामध्ये प्रवास, भोजन, निवास यांचा समावेश असेल. प्रवासाचा खर्च प्रती व्यक्ती जास्तीत जास्त 30,000 रुपये असून हा खर्च शासन उचलणार आहे.
पात्रतेचे निकष:
- लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.
- सरकारी, उपक्रम, मंडळातील कायम कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक व्यक्ती अपात्र ठरतील. मात्र, 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी आणि स्वयंसेवी कर्मचारी पात्र असतील.
- कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत नसावे.
आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्याचा ऑफलाइन अर्ज
- आधार कार्ड, रेशन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला किंवा रेशनकार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अधिक माहितीसाठी अर्जदारांनी नाशिकमधील सामाजिक न्याय भवनात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.