राज्य सरकारचा मोठा निर्णय:कोरोना संक्रमितांना होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती


मुंबई : म्युकर मायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार

देशासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. यातच आता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यानुसार कोरोना संक्रमितांचे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोना झाल्यावर घरी राहण्याऐवजी कोविड सेंटरमध्ये राहावे लागणार आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

टोपे पुढे म्हणाले की, लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते पण त्याला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने केंद्र सरकारने लसी आयात कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात. शिवाय, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यासाठी लागणाऱ्या लसीचे पैसे द्यायलाही राज्य तयार आहे, असेही ते म्हणाले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार
ते पुढे म्हणाले की, म्युकर मायकोसिसबाबत आम्ही जागरुक आहोत. रुग्ण वाढू नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेत आहोत.राज्यात म्युकर मायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने त्याला नोटीफाईड आजार घोषित केले आहे. रुग्ण आणि त्याबाबतची माहिती शासनाला देणे रुग्णालयांना बंधनकारक आहे. या आजारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन औषधाचे नियंत्रण केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने औषध दिल्यावर आपण त्याचे प्रत्येक जिल्ह्यात वाटप करतो. त्यामुळे रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच या आजारावर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. सध्या 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *