मनमाड पोलिसांची धडकेबाज कारवाई: जुगार अड्ड्यावर धाड टाकून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
दक्ष न्यूज प्रतिनिधी : रुपाली केदारे
मनमाड : शहरातील गायकवाड चौकात एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मनमाड पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा मारला आणि सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सहा ते सात जणांना अटक केली. आरोपींमध्ये विनायक कैलास कुलथे, महेश अण्णा गुरुकुल, पवन संजय गोंदे, सोहेल शेख अशपाक शेख, सागर वसंत बेदाडे, मजर रशीद सय्यद, आणि कुणाल सुभाष केकान यांचा समावेश आहे.
यावेळी पोलिसांनी जुगार खेळताना १ लाख ८४ हजार रुपये रोख रक्कम, सॅमसंग आणि विवो कंपनीचे मोबाईल फोन, आणि एक होंडा मोटरसायकल असा सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे.