नाशिकमहाराष्ट्र

चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची मागणी, माकपचे तीव्र निदर्शने


दक्ष न्यूज प्रतिनिधी: परमेश्वर आंधळे

नाशिक : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) तर्फे खुटवड नगर येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

निदर्शनावेळी माकपच्या नेत्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांचा कडक निषेध व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, आणि यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले पाहिजे. बदलापूरच्या घटनेत दोषींना तातडीने कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असा आक्रमक पवित्राही घेतला.

त्याचबरोबर, माकपने एफ.आय.आर. नोंदवण्यात विलंब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे अत्यंत लाजिरवाणे आहे.

निदर्शनांच्या वेळी माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. सिताराम ठोंबरे, माजी नगरसेवक कॉ. तानाजी (आप्पा) जायभावे, कॉ. राहुल गायकवाड, संजय पवार, कॉ. सतीश खैरनार, कॉ. मोहन जाधव, कॉ. विजया टिकल, कॉ. राकेश पाटील, कॉ. हिरमान तेलोरे, कॉ. अरविंद शहापूरे, एकनाथ इंगळे, अर्जुन माने, शुभम कटारे, संदीप गटकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या निदर्शनांद्वारे सरकारला इशारा दिला आहे की, येत्या निवडणुकीत जनतेने महायुती सरकारला धडा शिकवला पाहिजे, अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *