नाशिक बंदमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून निष्पाप हिंदूंवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
- महंत रामगिरी महाराज यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नये – हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
नाशिक: शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना भेटून नाशिक बंद दरम्यान घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करण्याची आणि निष्पाप हिंदू नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
या निवेदनात हिंदुत्ववादी संघटनांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नये, असे ठामपणे सांगितले आहे. या शिष्टमंडळात हिंदु एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण सावजी, गणेश उत्सव मंडळाचे समीर शेटे, विश्व हिंदु परिषदेचे योगेश बहळकर, धर्म सभेचे अड. भानुदास शौचे, इस्कॉन मंदिराचे कृष्ण स्वामी, वारकरी नाशिक तालुका समितीचे पदाधिकारी, सुदर्शन न्यूजचे विवेकानंद, तसेच इतर अनेक हिंदुत्ववादी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिक बंद दरम्यान घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त करत प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच निष्पाप हिंदू नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे आणि प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.