पाथर्डीगाव परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले; स्थानिक व्यक्तीचाही सहभाग
दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रविण सूरुडे
नाशिक : पाथर्डीगाव परिसरात तीन बांगलादेशी नागरिकांना अवैधरीत्या राहत असल्याच्या माहितीच्या आधारे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणि इंदिरानगर पोलिसांनी रविवारी (दि. १८) कारवाई केली. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषासह, त्यांना मदत करणाऱ्या एका स्थानिक नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक तपासानुसार, बांगलादेशी महिला त्यांच्या नातेवाईकांशी ‘आयएमओ’ नावाच्या अप्लिकेशनचा वापर करून संपर्कात होत्या. संशयितांची नावे शागोर हुसेन मोहंमद अब्दुल मलिक माणिक (२८), मुस्मम्मत शापला खातून (२६), इतिखानम मोहंमद लाएक शेख (२७, सर्व रा. हल्ली काजी मंजील, पाथर्डी, मूळ बांग्लादेश) अशी आहेत. त्यांच्यासोबत संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२, मूळ रा. वरवंडी, ता. दिंडोरी) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दहशतवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पथकाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान, एका महिलेला स्पा सेंटरमध्ये, तर दुसऱ्या महिलेला ब्युटी पार्लरमध्ये काम करताना आढळून आले, तर पुरुष घरातच राहत होता.
या तिघांनाही शहरात राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्यात स्थानिक नागरिकाने मदत केल्याचे उघड झाले आहे. या चौघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.