नाशिक

मनपाच्या पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई..


दक्ष न्यूज प्रतिनिधी

नाशिक : राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गणेशोत्सवा सह इतर सण उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहरातील मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण करू नये अशा मार्गदर्शक सूचना नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने वेळोवेळी मुर्तीकाराना व मूर्ती निर्माण करणाऱ्या व्यवसायिकांना दिल्या आहेत. मात्र काही मूर्तिकार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती तयार करीत असून छुप्या पद्धतीने साठा करून ठेवत असल्याची माहिती पर्यावरण विभागाला मिळताच,असा साठा केलेल्या मूर्ती जप्त करण्याची कारवाई मनपाच्या पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत केली जात आहे.

मनपाच्या सातपूर पर्यावरण विभागाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा साठा असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ११० मूर्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सातपूर विभागात वनविहार कॉलनी येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा साठा आढळून आला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या आदेशानुसार सातपूर विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ११० मूर्ती जप्त केल्या असून मूर्तिकारावर दंडात्मक कारवाई केली आहे.
या मोहिमेत सुरेंद्र लाहोरी , घना मुडा ,विजय सपकाळ सहभागी झाले होते.
शहरात अशा प्रकारचा पर्यावरणाला घातक मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणारे मूर्तिकार आढळल्यास पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे.प्रदूषण रोखण्यासाठी पर्यवर्ण पूरक उत्सव साजरे करावे असे आवाहन उपायुक्त निकत यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *