नाशिक विमानतळाला पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी एल्गार


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

पद्मश्री दादासाहेब गायकवाड हे नाशिकचे खासदार असतांना त्यांनी ओझर येथे एच.ए.एल. कारखान्याची उभारणी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या लढाऊ विमान निर्मिती करणाऱ्या कारखान्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने ओझर येथील नाशिक विमानतळाला दादासाहेब गायकवाड यांचे नाव दयावे, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटना एकत्र येत पुढे आल्या आहेत त्यासाठी त्यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत आणि रशिया या देशांची मैत्री होऊन लढाऊ मिग विमानांचा कारखाना भारतात उभारण्याचे ठरले असताना तो बंगलोर येथे होणार हे कळताच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भारताचे तत्कालिन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आग्रह करून हा विमान कारखाना नाशिकला ओझर येथे उभारण्यासाठी मंजुरी मिळविली. त्यालाच आपण एच. ए. एल. कारखाना असे म्हणतो. या कारखान्याचाच एक भाग म्हणून नाशिक विमानतळ निर्माण करण्यात करण्यात आले आहे. लढाऊ मिग विमान कारखाना निर्मितीसाठी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे तसेच ते नाशिकचे भूमिपुत्र असून ते नाशिकचे खासदार असतांना रोजगार निर्मितीसाठी नाशिक जिल्ह्यात मोठे योगदान आहे.

विमानतळाला कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रस्तावित नसल्याने सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे की, ओझर येथील विमानतळाला कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देऊन या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढेल. यासाठी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समिती नाशिकच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार यांना मागणीपत्र सादर केले आहे. लवकरच केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांना मागणीपत्र सादर करून आपली भूमिका मांडणार आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा या मागणीसाठी सक्रिय पाठिंबा आहे. शासनाची सकारात्मक भूमिका असल्याने समितीच्यावतीने कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा मोर्चाचे प्रयोजन सद्यस्थितीत नाही असे स्पष्टीकरण नामकरण समितीने पत्रकार परिषदेत दिले आहे.

या पत्रकार परिषदेत अण्णासाहेब कटारे, अशोक भाऊ दिवे, बाळासाहेब शिंदे, मदन अण्णा शिंदे, दिपचंद नाना दोंदे, भिवानंद काळे, भारत पुजारी, आदेश पगारे, बाळासाहेब साळवे, दीपक डोके, राहुल पटेकर, राजा भाऊ गांगुर्डे, उत्तम जाधव, प्रशांत कटारे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *