पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या स्थायी समितीची बैठक २ ऑगस्ट रोजी,परिषद आयोजनाचा नाशिकला मान
दक्ष न्युज प्रतिनिधी
नाशिक : केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे नाशिकमध्ये पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या स्थायी समितीची बैठक २ ऑगस्ट, २०२४ रोजी नाशिक येथे नियोजित आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही राज्ये तसेच दिव, दादरा, नगर व हवेली हे केंद्रशासीत प्रदेश आणि केंद्र शासन यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती राहणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळविले.परिषदेसाठी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह गुजरात, गोवा राज्याचे मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत. दिव दमण व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक उपस्थित राहणार असून अन्य सदस्य उपस्थित देखील राहणार आहेत. साधारणतः ८० हून अधिक प्रमुख अधिकारी यानिमित्ताने नाशिकमध्ये दाखल होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून बैठकीचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
परिषदेत आयुष्यमान भारत योजना तसेच विविध धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. वाघ यांनी दिली.

या परिषदेचे सनियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे नियोजन करण्यात येत आहे.