मोदी सरकारकडून कृषी क्षेत्राच्या विकासाला आत्मनिर्भर संकल्पनेची जोड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत – वासुदेव काळे


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून मोदी सरकारकडून कृषी क्षेत्राच्या विकासाला आत्मनिर्भर संकल्पनेची जोड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी नाशिक मध्ये शेतकरी संवाद अभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागात शेतकरी संवाद अभियान दौरा संपन्न झाला. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, डी.एन. ठाकूर, प्रदेश किसान मोर्चाचे संघटन सरचिटणीस मकरंद कोर्डे, सरचिटणीस सुधाकर भोयर, चिटणीस बापू पाटील, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णताई जगताप, चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे उपस्थित होते.
  
शेतक-यांशी थेट बांधावर जाऊन संपर्क आणि संवाद साधताना प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  शेतक-यांसाठी राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. आजच्या दौऱ्यात या अभियानाचा एक भाग म्हणून जानोरी येथे शेतक-यांच्या केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत भावना जाणुन घेतल्या.

सरचिटणीस सुधाकर भोयर यांनी यावेळी नाशिक जिल्ह्यातील संघटनात्मक रचनेचा आढावा घेतला. मंडलस्तरापर्यंत कार्यकारीणी पुर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. शेतक-यांसाठी कटीबध्द असलेल्या मोदी सरकारचे मन की बात कार्यक्रम मंडलस्तरावर आणि शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाण्याबाबत नाशिक आणि मालेगाव किसान मोर्चाने प्रभावीपणे नियोजन करावे असे आवाहन सरचिटणीस मकरंद कोरडे यांनी केले.

आजच्या दौऱ्यात प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे आणि पदाधिकारी यांनी किसान मोर्चा प्रणित महाकिसान वृध्दी फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशन कार्यालयाला भेट देऊन कलश पूजन केले आणि नाफेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने होत असलेल्या कांदा साठवणूक बाबत माहिती घेतली. यावेळी त्यांना किसान मोर्चा प्रणित फेडरेशन कडून साडेसातशे शेतकऱ्यांना 7 कोटी 64 लाख रुपये वितरित करण्यात आल्याचे फेडरेशन चे सचिव रवींद्र अमृतकर यांनी उपस्थितांना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *