प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे अकरा देशांत कौतुका सह ५४ पुरस्कार


तूझं तूच शोध रान, म्हणून एक भटकंती .

एक धडपड, एका जीवाची ..

आपल्या लोकांपासून दूर, दूरवरचा प्रवास …

कित्येक रस्ते पालथे घातले, मग मिळालं का हवं ते ?

मुंबई: करणसिंग पवार

पुणे प्राप्तिकर विभागातील सहआयुक्त विठ्ठल भोसले यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला ‘फिरस्त्या’ हा मराठी चित्रपट जागतिक पातळीवर नावाजला गेला आहे. परदेशातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्या या चित्रिपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘फिरस्त्या’ हा चित्रपट प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. ‘फिरस्त्या’ने प्रदर्शनापूर्वी भारत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या देशांमधील २४ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५३ पुरस्कार जिंकले आहेत. या अकरा देशांमध्ये ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे कौतुक होत आहे,’ असे निर्मात्या डॉ. स्वप्ना भोसले यांनी सांगितले.

‘सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून १८ आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे १७ पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पाच, तर समीर परांजपे याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सहा ठिकाणी गौरविण्यात आले आहे. समर्थ जाधव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), गिरीश जांभळीकर (सर्वोत्कृष्ट छायाचित्रण), प्रमोद कहार (सर्वोत्कृष्ट संकलन ) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की या देशांमधील चित्रपट महोत्सवांत ‘फिरस्त्याची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. करोना प्रादुर्भावामुळे ऐन वेळी रद्द झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली.

भोसले यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी हे आहे. झुंजार मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या ‘फिरस्त्या’ मध्ये समीर परांजपे, हरीश बारसकर, मयूरी कापडणे, अंजली जोगळेकर, श्रावणी अभंग, समर्थं जाधव, आज्ञेश मुडशिंगकर आदींनी भूमिका केल्या आहेत.

विठ्ठल भोसले, दिग्दर्शक

चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि यू-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट तयार केला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असल्याने हुरूप वाढला आहे. – विठ्ठल भोसले, दिग्दर्शक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *