लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर; जाणून घ्या कारकीर्द ..


पंतप्रधान मोदींनी केली घोषणा..

दक्ष न्युज, प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत एक घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी भारताच्या राजकारणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोन वर संपर्क साधून त्यांना या पुरस्काराबद्दल माहिती दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. अडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरुवात करुन उपपंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृह खातं आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबत थोडक्यात:

लालकृष्ण अडवाणी (नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.

इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते. ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१ च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.

त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *