मनपा पूर्व प्रभागाच्या सभापतिपदी दीपाली कुलकर्णी बिनविरोध; १९ जुलैला होणार सर्व सभापती निवडणूक


नाशिक: प्रतिनिधी

महापालिकेच्या नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, सातपूर, नाशिकरोड व पंचवटी या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी १३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. या निवडणुकीत पूर्व प्रभाग समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

पूर्व प्रभाग समिती सभातिपदासाठी भाजपाच्या दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. मात्र निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नाशिक महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक सोमवारी (दि. १९) होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाचे मच्छिंद्र सानप, पूनम सोनवणे, रूचीकुमार कुंभारकर या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपाचे प्रशांत हिरे, मिरा हांडगे, सुमन सातभाई या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नवीन नाशिक (सिडको) प्रभाग समिती सभापतिपदासाठी सुवर्णा मटाले, छाया देवांग या भाजपाच्या दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ऐनवेळी कोण माघार घेणार? यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या वत्सला खैरे, भाजपाचे योगेश हिरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहे. सातपूर प्रभाग समिती सभापतिपदासाठी मधुकर जाधव व मनसेचे योगेश शेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र या समितीत मनसेला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐनवेळेला मधुकर जाधव यांनी माघार घेतल्यास मनसेचे योगेश शेवरे हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या सहाही प्रभाग सभापतींचा कार्यकाळ हा ३१ मार्च रोजी संपुष्टात आला होता. मार्च महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुकांसाठी १९ जुलै रोजी पिठासनाधिकारी म्हणून विभागीय महसूल आयुक्तांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत या सहाही प्रभाग सभापतींच्या निवडणूका ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या निवडणुकींसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, गटनेते अरुण पवार, सभागृहनेते कमलेश बोडके, माजी सभागृह नेते सतिष सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. मनसेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाप्रमुख दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलीम शेख उपस्थित होते. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना शाहू खैरे, गजानन शेलार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या सहाही प्रभाग समि सभापतिपदासाठी बिनविरोध निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *