धक्कादायक! पायी चालणाऱ्या युवकाला ट्रॅकने चिरडले..
दक्ष न्युज प्रतिनिधी, भागीरथ आतकरी
इगतपुरी: तालुक्यातील मुंढेगाव फाट्यावर मुंबई- आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक दिल्याने अपघात झाला . या अपघातात युवक जागीच ठार झाला. अविनाश कैलास गतीर असे या अपघात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. काल सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मुंढेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही बाजूला दीड दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला आहे. यामुळे वरिष्ठ पोलीस प्रशासन, महामार्ग प्रशासन, महसूल अधिकारी आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे यावेळी संतप्त आंदोलकांनी सांगितले होते.
अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर ग्रामस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात. मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे उड्डाण पूलाची प्रमुख मागणीसह अन्य मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. घटनास्थळी किमान ८ ते १० हजार नागरिकांचा जमाव उपस्थित होता.